खामगाव, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे IQAC यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समिती आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी प्रशिक्षण वर्गाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थिनींमध्ये कौशल्यविकास, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि उद्योजकतेची भावना निर्माण व्हावी, तसेच त्यांना भविष्यात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या मेहंदी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये ‘सिंपल टू बेसिक’ आणि ‘ॲडव्हान्स मेहंदी कोर्स’ असे दोन प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या दोन्ही प्रशिक्षण वर्गांमध्ये एकूण ७३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रशिक्षण वर्गाचे प्रभावी प्रशिक्षण कु. किरण ताठे यांनी दिले. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना मेहंदी कलेतील मूलभूत कौशल्यांपासून विविध आकर्षक व प्रगत मेहंदी डिझाईन्सपर्यंत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमाणपत्र वितरण समारंभास अध्यक्ष डॉ. संजय वराडे (प्राचार्य, गो. से. महाविद्यालय, खामगाव), प्रमुख अतिथी मा. सौ. श्रद्धाताई बोबडे (सदस्य, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), प्रमुख अतिथी मा. राधा इनकर (पोलीस उपनिरीक्षक, खामगाव ग्रामीण, खामगाव),तसेच प्रमुख उपस्थिती डॉ. डी. एस. तळवणकर (वनस्पतीशास्त्र विभाग, गो. से. महाविद्यालय खामगाव) यांची उपस्थिती लाभली.
यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. डी. एन. व्यास, डॉ. एम. एस. गायकवाड, डॉ. जे. डी. पोरे, महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या समन्वयक डॉ. रेश्मा मारवाडी , प्रा. संगीता वायचळ, प्रा. सुरज ठेंग, प्रा. अक्षय सिदाम तसेच प्रशिक्षक कु. किरण ताठे ही देखील उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्णत्वाची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मेहंदी कलेसारख्या कौशल्यातून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण होऊ शकते आणि आपल्या कौशल्याला व्यावसायिक स्वरूप देऊन आत्मनिर्भर होता येते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी आयोजन व पूर्ततेसाठी महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समिती तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विभागाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध मेहंदी डिझाईन्समध्ये आपले कौशल्य आत्मविश्वासाने सादर केले. या प्रकारचे नव उपक्रम घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाषजी बोबडे आणि सचिव डॉ. प्रशांत जी बोबडे यांचे नेहमी मार्गदर्शन आणि प्रेरणा यासाठी मिळत असते.
७३ विद्यार्थ्यांना मेहंदी कलेचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणपत्र प्रदान करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासोबतच महिला सक्षमीकरण व उद्योजकतेला चालना देणारा ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी.एन. व्यास यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा बेद्रे, आभार प्रदर्शन डॉ. एम. एस. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीचे सदस्य तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

