शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनवर शेख आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित आरिफ शेख यांचा मृत्यू; कव्वाली कार्यक्रमानंतर वाद विकोपाला गेल्याची प्राथमिक माहिती !

बुलढाणा | देऊळगाव राजा :
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. मृतांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनवर शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित कार्यकर्ता आरिफ शेख यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे देऊळगाव राजा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कव्वाली कार्यक्रमानंतर वादाचा भडका
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरात आयोजित करण्यात आलेल्या कव्वाली कार्यक्रमादरम्यान काही कारणावरून वाद निर्माण झाला. कार्यक्रम संपल्यानंतर हा वाद अधिक चिघळला. त्यानंतर पोलीस ठाण्यासमोरच दोन गट आमनेसामने आल्याची माहिती आहे.
लहान मुलांच्या भांडणातून सुरुवात झालेला वाद आणि त्यातून पूर्वीपासून असलेला राजकीय वाद उफाळून आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनवर शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित कार्यकर्ता आरिफ शेख यांचा समावेश असल्याचे समजते.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
राजकीय वर्तुळातही खळबळ
एकाच घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याने देऊळगाव राजा शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मृतांपैकी एक नगरसेवक असल्याने या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याचीही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, घटनेचे नेमके कारण, हाणामारीत सहभागी असलेले व्यक्ती आणि या प्रकरणातील आरोपींबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
(ही बातमी प्राथमिक माहितीनुसार असून, पोलिसांकडून अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर तपशील अद्ययावत करण्यात येईल.)
